Friday, 3 May 2024

उन्हाळी सुट्टी आणि बालचमू याविषयी.....

 उन्हाळी सुट्टी आणि बालचमू याविषयी.....

लेखक- राजू सुखदेव आटपाडकर, शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा



यंदा नुकत्याच शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे बालच मूंना गावाला फिरायला मामाकडे जायचे वेध लागले आहे. पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया.......या गीताची आठवण होते. सर्वांना मामाचा गाव म्हटला की राने, आंब्याची झाडे, वाडा, मायाळू मामी, आजी, आजोबा, मामे भाऊ, मामे बहीण यांचे चित्र डोळ्यासमोर तयार होते. पोहणे, गप्पागोष्टी, झाडावर चढणे, एकत्र जेवणे, शेतातील कामात मदत करणे, वेगवेगळ्या फळझाडांची माहिती घेणे, इत्यादी बाबी शहरात राहणाऱ्या मुलांना नवख्या असतात किंवा त्याचा अनुभव घेण्याची संधी त्यांना मिळत नाही. हे सर्व आता जवळजवळ हरवत चालले आहे. सर्वत्र सिमेंटची जंगले तयार होत आहेत आणि मामाचा आठवणीतला गाव लुप्त होत चालला आहे. वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मोबाईल या यंत्राच्या शोधामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल झाले आहेत. त्यांचे फायदे भरपूर आहेत. सुखदुःखाचे निरोप चटकन मिळतो, असे जरी असले तरी मोबाईल फोन जेव्हापासून स्मार्ट झाला तेव्हापासून बालचमू मात्र त्यात जास्त रमत गेले, मैदानावरील खेळ कमी झाले, मोबाईल वरील गेम्स खेळणे, व्हिडिओ पाहणे, या तासन् तास वेळ जाऊ लागला. आई, बाबा, नातेवाईक यांच्याकडे मोबाईल पाहण्यासाठी मुले हट्ट करू लागली. कार्टून्स ने तर मुलांना आपल्या विश्वात ओढून घेतले.

याचे परिणाम असे झाले की, मैदानी खेळाकडे दुर्लक्ष झाले, चिडचिडा स्वभाव बनला, डोळ्यांचे विकार, लठ्ठपणा, कुटुंबातील संवाद कमी झाले, मोबाईल मुळे मुले मानसिक समायोजन करण्याची क्षमता हरवून बसली, मित्र मैत्रिणींशी खेळणे, हारणे जिंकणे हा आनंद कमी झाला. एकलकोंडी स्वभाव तयार झाला. मुले शांत बसत नाहीत, तर हा मोबाईल घे आणि शांत बस. यामुळे पालकांना मोकळा वेळ मिळू लागला पण त्यामुळे मुले लट्ट होऊ लागली. मैदानी ओस पडत गेली. आजोबांचा संवाद कमी झाला आहे.

सद्यस्थितीत मुलांना मोबाईल फक्त पालकांच्या उपस्थितीत योग्य मर्यादित वेळेत व विधायक गोष्टींसाठी, नवीन माहिती मिळवण्यासाठी वापर करणे गरजेचे आहे. मुलांना परिसराची ओळख करून द्यावी. यावेळी जून महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला एक रोप लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा. मुलांना सकाळी व संध्याकाळी मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे. आजी, आजोबा घरातील सर्व मंडळी संध्याकाळी एकत्र बसून गप्पा माराव्या. जुनी परंपरा, इतिहास इत्यादीची माहिती मुलांना द्यावी. मुलांना त्यांचे मत मांडण्यास परवानगी द्यावी व त्यांचा आदर करावा. रोज सकाळी लवकर उठणे, व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता, देवपूजा, वडीलधाऱ्या व्यक्तींना वंदन करणे, पोट भर सात्विक आहार, नाश्ता, वाचन, लेखन, गणन क्रिया, नाविन्यपूर्ण पुस्तके, कादंबरी इत्यादी वयोगटा नुसार वाचण्याची संधी द्यावी. घरकामात मदत, विश्रांती, मित्रांसोबत पारंपारिक खेळ जसे की, लगोरी, कबड्डी, मल्ल, हुतूतू, सुरपाट्या, बुद्धिबळ, कॅरम, यासारखे खेळ, सूर्यनमस्कार, बैठका, जोर, मुक्त हालचाली, पोहणे, बागेत फिरणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी, ट्रेकिंग करणे, प्राणी, पक्षी व वनस्पती यांचा प्रत्यक्ष माहिती व अनुभव जेवढा शक्य आहे तेवढा घेणे.

अशाप्रकारे यंदाची उन्हाळी सुट्टी बालचमूंना चांगला अनुभव देणारी व्हावी, यासाठी पालकांनी योग्य भूमिका घेणे व त्यांना संधी उपलब्ध करून देणे हे काळाची गरज आहे.

1 comment: